You are here

‘सुकृत’च्या ‘गृहवैद्य’चे  प्रकाशन

बातमी: लोकसत्ता दैनिक: दिनांक. २१-८-२०१० 

    सातारचे सुप्रसिद्ध वैद्य सुयोग दांडेकर लिखित ‘गृहवैद्य’ या पुस्तकाचे नुकतेच झुरिक (स्वित्र्झलड) येथे युरोपियन साहित्य संमेलनात प्रशांत दामले यांच्या हस्ते प्रकाशन झाले. पुण्यातील सुकृत प्रकाशनने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या प्रकाशन संस्थेने पुस्तकाची निर्मिती अत्यंत दर्जेदार केली असून  संस्थेचे हे दहावे पुस्तक आहे.
आयुर्वेदाचा प्रसार हे ध्येय ठेवून वैद्य सुयोग दांडेकर यांनी आजपर्यंत अनेक उपक्रम राबवले. ‘गृहवैद्य’ हाही एक अभिनव उपक्रम त्यांनी हातात घेतला आहे. गृहिणींना जर आयुर्वेदाचे आवश्यक तेवढे ज्ञान मिळाले तर प्रत्येक घर आरोग्यसंपन्न होईल आणि शक्यतो डॉक्टरकडे जाण्याची वेळच येणार नाही. हे ओळखून गृहिणींसाठी हा गृहवैद्य पोस्टल कोर्स सुरू केला आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत हा कोर्स पूर्ण होतो. या कोर्ससाठी तयार केलेले ‘गृहवैद्य’ हे पुस्तक आयुर्वेदाबद्दल जागरूकता निर्माण करते.
या पुस्तकाबद्दल प्रशांत दामले म्हणाले, की ‘गृहवैद्य’ हे पुस्तक वाचल्यावर मला कितीतरी नवीन गोष्टी कळून आल्या. आपल्या रोजच्या आहारातील चुकीच्या गोष्टी आणि उत्तम आरोग्यासाठी काय करावे, याबाबत डॉक्टरांनी केलेले विवेचन समजायला सोपे आणि अनमोल आहे. प्रत्येक घरातील गृहिणीने हा कोर्स केला आणि या पुस्तकाचा अभ्यास केला तर सर्व समाजाचे आरोग्य सुधारेल, यात शंका नाही. वैद्य सुयोग दांडेकर म्हणाले, रोग झाल्यावर वैद्याकडे धाव घेतली जाते. परंतु रोग होऊच नये यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. या कोर्समुळे घरची गृहिणी आरोग्याबाबत सजग होईल आणि संपूर्ण घराचे आरोग्य सुधारेल, अशी मला खात्री आहे.