You are here

जीवा महाला कादंबरीचे प्रकाशन

(28 Dec) सातारा, २८ डिसेंबर (हिं.स.) : आज व्हॉटस अ‍ॅप, फेसबुकच्या जमान्यात मुले सर्वच खेळ खेळतात मात्र ती मैदानात नव्हे तर मोबार्इंलवर. आजच्या जमान्यातला पिढीला व तरुणाईला देश कार्य व देशासाठी जीवाची बाजी देणारे शूर लढवय्ये हे इथलेच होते, व या सर्वांचा इतिहास कळल्याशिवाय घडलेला पराक्रम व इतिहास समजणार नाही. प्रा. डॉ. सुरेश गायकवाड यांनी याच जीवा महाला या कादंबरीचे लेखानातून हा जाज्वल्य इतिहास समाजासमोर मांडला आहे. हे पुस्तक नव्या पिढीला मैदानाकडे नेहण्याचे काम करणार आहे. असे उद्गार इतिहासाचे अभ्यासक व प्रभावी वक्ते व शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे- बानगुडे पाटील यांनी काढले. येथील कला वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व हिंदी व संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ.सुरेश गायकवाड यांनी लिहिलेल्या जिवा महाला या कादंबरीचा प्रकाशन समारंभ नितीन बानुगडे पाटील यांचे हस्ते व अनेक मान्यवरांचे उपस्थितीत पाठक हॉल नगरवाचनालय येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहासाचे अभ्यासक व लेखक विश्वास दांडेकर उपस्थित होते. तसेच दैनिक ग्रामोद्धारचे संपादक धनंजय उर्फ बापूसाहेब जाधव, नगर वाचनालयाचे अध्यक्ष सी. व्ही. दोशी, उपाध्यक्ष युवराज पवार, माजी उपनगराध्यक्ष शंकर(भाऊ) दळवी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. आपल्या प्रास्ताविक भाषणात नगर वाचनालयाच्या विश्वस्त डॉ. ज्योत्सना कोल्हटकर यांनी वाचनालयाचेवतीने वाचक व्यासपीठातर्फे आयोजित करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन जीवा महाले कादंबरीमुळे केवळ एका ओळीत असणारा इतिहास हा संपूर्ण कादंबरीतून गायकवाड सरांनी समाजापुढे आणला असून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार डॉ.सुरेश गायकवाड यांनी केला. तर श्रीधर साळुंखे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. आपल्या या कादंबरी लेखनाबद्दल बोलताना विश्वास दांडेकर यांची मोठी मदत झाली. या कादंबरीतील लेख हे दैनिक ग्रामोद्धारमध्ये मागील वर्षी प्रकाशित होताना अनेकांनी लेखनाचे कौतुक केले म्हणून हे पुस्तक प्रकाशनाचा मी निर्णय घेतला, आज हिंदी विषयाचा सेवा निवृत्त प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाही ऐतिहासिक लढा व तत्कालीन जीवन शैली, जीवा महालेंचे त्यावेळचे योगदान यासाठी ही कादंबरी मी रंगवत गेलो. अनेकांकडून आशिर्वाद आणि पाठिंबा मिळाल्यानेच हे लेखन साध्य होत गेले. अफजलखानाचे वधाचा प्रसंग हा संपूर्ण इतिहास बदलविणारा होता व त्यासाठी जीवांनी दिलेले योगदान तितकेच मोलाचे ठरले. याचाच परीपाठ म्हणून शिवरायांनी जीवाला दिलेले प्रशस्तीपत्र हे पराक्रमाची गाथा सांगणारे आहे. राजांनी त्याचे अंगी असणारे अनेक गुण हेरत दिलेली कामगिरी तितक्याच मोलाची समजून स्वत:चा जीव धोक्यात घालून केलेले शौर्यं हे नव्या पिढीला विस्तृतपणे समजावे यासाठीच हे लेखन झाले. यावेळी सुकृत प्रकाशनाच्या सुनिता दांडेकर, शंकर दळवी यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन सरांनी पुढेही लिहीत रहावे अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना दै. ग्रामोद्धारचे संपादक बापूसाहेब जाधव म्हणाले की, ही कादंबरी छापताना उत्कंठा वाढत होती. अनेकांनी या लेखनाच कौतुक केले. तत्कालीन प्रसंग हे हुबेहुब सरांनी लेखनात उतरवले. 'होता जीवा मह्णून वाचला शीवा' या एका ओळीवरुन हे चरित्र लिहिणे म्हणजे खरोखरच सुतावरुन स्वर्ग गाठण्या सारखे आहे. ३६ भागत संपलेली ही लेखन माला किमान ५० भागांची तरी हवी होती. सरांनी जीवा महाला लिहीताना ते अक्षरश: त्यात वाहून घेत इतिहास माहित नसतानाही ही कादंबरी उभेकरण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. याचे विशेष कौतुक वाटते. आपल्या व्याख्यानात बोलताना नितीन बानुगडे पाटील पुढे म्हणाले की, आज वाचनाचा आढावा घेतला असताना सर्वाधिक वाचन हे ऐतिहासिक पुस्तकांचेच होते हे दिसून येते. सरांनी मांडलेला हा जीवा महालेचा जीवनपट हा अतिशय सोप्या, सुलभ व सोज्वळ भाषेत मांडला, व असा साहित्य प्रकार निवडल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. आज मितीस इतिहासावर चित्रपट निर्माण करुन त्यावर वादंग वाढते आहे बाजीरावाचे शौर्य पहाण्यापेक्षा हा चित्रपट आम्ही मनोरंजन म्हणुन पुढे आणला असे सांगणारे हे चित्रपटाचे निर्माते अजब वाटतात. मात्र हा विषय हा आपला पराक्रमी इतिहास व जाज्वल्य प्रेरणा देणार असताना हा विषय मनोरंजनाचा होऊच शकत नाही. जे मावळे स्वराज्यासाठी आपली बाजी लावून लढले. त्या शुरांचा हा अपमान आहे. शिवरायांनी जीवावर टाकलेली जबाबदारी व जीवाचा जीवन प्रवास पहाता पुढे जीवाचे रुपांतर हे शिवात आणि शिवाचे रुपांतर जीवात झाले व त्यातून जीवा शिवाची जोडी इतके नाते घट्ट झाले. असे एकत्वाचे नाते सांगणारे प्रसंग हेच या कादंबरीचे मोठे यश आहे. शिवरायांनी अनेक दुर्ग बांधतानांच जीवा सारखे अनेक नरदुर्ग तयार केले व राष्ट्रीय चारित्र्ये निर्माण केली. औरंगजेबालाही भिती ही शिवरायांपेक्षा त्याच्या स्वामीत्व बाळगणा-या शूर लढवैय्या मावळ्यांची होती. गायकवाड सरांनी केवळ जीवा महालाचे जीवन सांगत लेखन न थांबवता आता नवीन ज्ञानोबा घडवण्यासाठी निवृत्तीनाथांची भूमिका पार पाडावी व राष्ट्रभक्तीसाठी असे लेखन पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणातून बोलताना विश्वास दांडेकर यांनी गायकवाड सरांनी या कादंबरीचे निर्मितीतून एक नवीन साहित्य प्रकाराला जन्म दिला आहे. काहीही माहिती हातात नसताना तत्कालीन समाज, माणसे, त्यांच्या चालीरिती, भूगोल, नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेउन ही कादंबरी रंजक, ऐतिहासिक बनवत प्रत्येक पान हे इतिहासाचे पान म्हणून वाचकाला आनंद देत आहे. राजा आणि त्या प्रजेने आपल्या राजासाठी दिलेले बलिदानातून हा इतिहास उभा राहिला. आपल्या राजासाठी जीवन मरणाचा लढा जनता देते. राजाबरोबरच असे योगदान देणा-या शूर महापुरुषांची साथ ही तितकीच प्रभावी व मोलाची ठरते. अफजल वधाचे साठी शिवरायांनी तब्बल १ वर्षभर आधी नियोजन केले होते. हे सारे नियोजन करताना सावध मन असणारा नेता व त्याचे मागे जीवा सारखे असणारे असंख्य मावळे त्यांचेशी जोडले गेले होते. अनेक बलीदान देणारे हे काळाच्या पडद्याआड गेले व त्यांचे योगदान कुणाला कळलेही नाही. अशा विविध प्रकारच्या बलीदान देणा-यांचे नावाने आता राज्याच्या प्रत्येक जिल्हयात एक वीर युद्ध स्मारक उभारले जावे व सातारा जिल्ह्याने यासाठी पहिले पाउल उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदिश पवार यांनी केले. तर आभार डॉ.शाम बडवे यांनी मानले. समारंभास संभाजीराव पाटणे, अरुण गोडबोले, डॉ.कोल्हटकर, डॉ.राजेंद्र माने, दिनकरराव शालगर, सुमन भिडे, डॉ.देवदत्त गायकवाड, स्नेहल गायकवाड, प्रभावती गायकवाड, शरदराव चव्हाण, प्रदीप कांबळे, पदमाकर पाठकजी, डॉ.सुभाष दांडेकर, बाळासाहेब इनामदर यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदुस्थान समाचार /२८. १२. २०१५/ अतुल देशपांडे / देवेश फडके