You are here

घरच्यांसाठी शिका आयुर्वेद

Media Image: 

धकाधकीच्या जीवनात आपण मनावर, शरीरावर नको तेवढा ताण देतो आहोत आणि त्यातून आजारी पडू या भीतीने घेरले जात आहोत. तात्कालिक कारणांसाठी ऍलोपॅथीचे औषध घेतल्यावर काही पर्यायी उपचार पद्धती अवलंबावी असा विचार करू लागलो आहोत. निरोगी जीवन जगण्याच्या इच्छेने पुन्हा आपण आयुर्वेदाकडे वळतो आहोत. आपल्या आजारांवर उपचार करून घेण्यासाठी वैद्याकडे जाऊ लागलो आहोत. त्याचवेळी आपल्या लक्षात येतं, की केवळ वैद्यांनी दिलेली औषधे पुरेशी नाहीत, आपली जीवनशैली आयुर्वेदीय असायला हवी. आपली आजी जे घरचे उपचार करायची ते आयुर्वेदीकच असायचे की! जे कुटुंबात परंपरेने चालत आलेले होते, ते तर आता विसरले गेले आहे. मग हे पुन्हा शिकणार कसे? वैद्य सुयोग दांडेकर यांनी लिहिलेले "गृहवैद्य' हे पुस्तक तुमची घरच्या घरी वैद्य होण्याची इच्छा पूर्ण करील. हे पुस्तक नाहीच, हे आहे पाठ्यपुस्तक. ते वाचताना आपण एक अभ्यासक्रम पूर्ण करीत जातो. अभ्यास नेटका, नेमका केला तर घरातील सर्व माणसांचे आरोग्य ठीकठाक ठेवता येईल. या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. 

या पुस्तकात "आजीबाईंचा बटवा' आहेच. पण त्याचबरोबर तुम्हाला तुमची प्रकृती कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. आपली प्रकृती समजली, तर आजाराचं कारण नेमकं कळतं. आपण आजारी पडू नये या करिता काय करावं लागेल हेही समजतं. त्यादृष्टीने वैद्य दांडेकर सुरेख समजावून सांगतात. लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, खोकला, दमा, अतिसार, मधुमेह, हृदयविकार, मूळव्याध, स्थूलता, मूतखडा हे आजार का होतात, ते कसे टाळता येतील आणि झालेच तर या आजारात कोणती उपाययोजना करता येईल, याचे मार्गदर्शन आहे. आपल्या गच्चीत, परसात काही वनस्पती रुजवणे गरजेचे आहे. या वनस्पती कधीही उपचारांसाठी हाताशी येतात. या वनस्पती कोणत्या, त्याचे नेमके काय उपयोग आहेत हेही पुस्तकात सांगितले आहे. आयुर्वेद व योग हे एकमेकांशी संबधितच आहेत. कोणती आसने कोणी व का करावीत हे माहित हवे. ती माहितीही येथे आहे. 

घरात सर्व कामे करतानाही घरच्यांची काळजी घेण्यासाठी गृहिणीच गृहवैद्य होऊ शकेल अशी या पुस्तकाची मांडणी आहे. साहजिकच आयुर्वेदांतर्गत आहारशास्त्राचीही माहिती येथे देण्यात आली आहे. गृहिणी स्वयंपाकघरातील दवाखाना आपल्या घरच्यांसाठी उपयोगात आणू शकेल, एवढा आत्मविश्‍वास हे पुस्तक देईल. दर पंधरा दिवस एक लेख वाचावा, मनन करावा, त्यातील शंका लिहून काढाव्यात, प्रत्येक पाठाखालील स्वाध्याय सोडवावा म्हणजे तयारी होऊ शकेल, अशी रचना आहे. गृहिणींनी अभ्यास करून लिहिलेली उत्तरे, त्यांच्या शंका लेखकाकडे पाठवल्यावर त्यांना ती तपासून परत पाठवली जातील. वाचकांसाठी हे केवळ पुस्तक नसेल, तर टपालाने करता येणारा आयुर्वेद अभ्यासक्रम आहे. 

गृहवैद्य - वैद्य सुयोग दांडेकर,
सुकृत प्रकाशन, रामकुंज, सर्व्हे ४६ - ६ - ३,
अद्वैतनगर, पौड रस्ता, पुणे.
पाने - १९६, किंमत - ३५० रुपये.