महाराष्ट्रातील अपरिचित स्थानांचा परिचर घडविणारे पुस्तक
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होऊन आपण आपल्या राज्याचा सुवर्णमहोत्सव सहर्ष उल्हासाने, वैभवाने आणि उत्स्फूर्ततेने साजरा करतो आहोत. त्याचप्रमाणे २०११ हे वर्ष महाराष्ट्र पर्यटनवर्ष म्हणूनही साजरे होते आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा सार्थ अभिमान जागृत करणे, त्यांच्या प्रत्यक्ष भेटींची सदिच्छा पूर्ण होण्यासाठी समयोचित दिग्दर्शन करण्याच्या भूमिकेतून गेली अनेक वर्षे केलेला हा प्रत्यक्ष अनुभवाधिष्ठित पर्यटन प्रपंच!
या पुस्तकात वर्णन केलेली नैसर्गिक, धार्मिक, पारंपरिक, ऐतिहासिक, भाविक, मानवनिर्मित अशी विविध पर्यटनस्थळे वाचकांनी, पर्यटकांनी ‘याचि देही याचि डोळा’ पहावीत, अनुभवावीत, उपभोगावीत आणि महाराष्ट्राचा अभिमान आणि संस्कृती जागवावी आणि जोजवावी, या आंतरिक उमाळ्याने, तळमळीने हे लेखन घडलेले आहे. याचा प्रत्यय वाचकांना येईलच.
महाराष्ट्रातील ३५ अभयारण्ये, ५ राष्ट्रीय उद्याने वनपर्यटनासाठी अत्यंत अनुकूल आहेत. सिंधुदुर्ग, मालवण, रत्नागिरी जवळचे समुद्रकिनारे, किनारीनिवास, जलक्रीडा, बोटींगसाठी आकर्षक आहेत. तसेच आता स्कुबाड्रायव्हिग, समुद्रतळदर्शनासारख्रा सोयींनी,सुविधांनीही सज्ज होत असून सागरी पर्यटनाचा नवा मार्ग पर्यटकांना खुला होतोय. घोलवड, तरळ, बारामती, नेरळ इत्यादींसारखी ठिकाणं नवनव्या कृषी प्रयोगासाठी, निसर्ग सान्निध्यासाठी प्रसिद्ध होत असून शेतीशी, वृक्ष लागवडीशी जवळीक साधणारं नवं कृषी पर्यटन निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी आकाराला यतंय.
आनंद देण्यासाठी, घेण्यासाठी, रोजच्या जीवनातून दूर जाऊन चांगला बदल अनुभवण्यासाठी, शांतता, समाधान, निसर्गपरिचय याचा आस्वाद घेण्यासाठी या अपरिचित स्थानांना अवश्य भेट द्यावी.
याठिकाणी दिलेली ठळक माहिती आणि सचित्र, रंगीत, आकर्षक महाराष्ट्राचा प्रवासी नकाशा पहा व वाचा, अभ्यासा, इतरांना दाखवा व यासह निघा प्रवासाला.
पुनरावलोकन लिहा